

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: निमगाव केतकीला जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन, हर घर जल योजना अंतर्गत 90 कोटी रुपयांच्या योजनेला अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आता या भागातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे निमगावकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. शनिवारी (दि. 3) निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच मीना भोंग, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, दशरथ डोंगरे, मच्छिंद्र चांदणे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा भरणेवाडी येथे शाल, श्रीफळ, फेटा आणि पेढा भरवून योजना मंजूर केल्याने जाहीर सत्कार केला. या वेळी माजी राज्यमंत्री भरणे गावकर्यांशी संवाद साधताना बोलत होते.
या वेळी भरणे म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील 246 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन, हर घर जल योजनाअंतर्गत निमगाव केतकी गावठाणासह जवळपास 46 वाड्या-वस्त्यांवरील माऊलींच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरणार आहे. दरडोई 55 लिटर प्रतिमाणसी पाण्याचे वितरण होणार आहे.
या योजनेत गावामध्ये दोन ठिकाणी साठवण तलाव, नवीन पाच टाक्या, पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, सौरऊर्जा प्रकल्प आदींचा समावेश असणार आहे. या वेळी सरपंच प्रवीण डोंगरे म्हणाले की, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे नवीन योजनेच्या माध्यमातून गावासह वाड्यावस्त्यांवरिल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. या वेळी माजी उपसरपंच सचिन चांदणे, संदीप भोंग, भारत मोरे, मनोहर मिसाळ, बाबासाहेब भोंग, अशोक भोंग, मधुकर भोसले, माणिक भोंग, संतोष जगताप, सागर मिसाळ, अजित मिसाळ, अभिजित गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.