निओ मेट्रोला मिळणार गती; उपमुख्यमंत्र्यांचा एचसीएमटीआरवरील ड्रीम प्रोजेक्ट साकारणार

निओ मेट्रोला मिळणार गती; उपमुख्यमंत्र्यांचा एचसीएमटीआरवरील ड्रीम प्रोजेक्ट साकारणार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिका हद्दीतील प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यांवर (एचसीएमटीआर) 'निओ मेट्रो' प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बळ मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाला खर्‍या अर्थाने गती मिळाली होती. आता उपमुख्यमंत्रिपदाची धुरा हाती आल्याने देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प मार्गी लावतील, अशी आशा आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात 36 किमी लांबीचा एचसीएमटीआर मार्ग आरक्षित आहे. 1987 पासून हा मार्ग कागदावरच राहिला.

मात्र, राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून त्यासाठी जागतिक दर्जाची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, या निविदांचे दर अवाच्या सव्वा दराने आल्याने त्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर प्रकल्प अडखळला. त्यातच राज्यात सत्तांतर झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एचसीएमटीआर मार्गावर निओे मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी चाचपणी करण्याची सूचना केली.

विशेष म्हणजे, तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी एचसीएमटीआर मार्गावर नियो मेट्रो प्रकल्प राबवावा, अशी भूमिका घेतली. त्यानुसार महामेट्रोने निओ मेट्रोचा डीपीआर तयार केला आहे. आता राज्यात पुन्हा सत्तांतर झाले आहे. मात्र, पुण्यातील एचसीएमटीआर आणि त्यावरील निओ मेट्रोसाठी आग्रही भूमिका घेणारे फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडणार नसून त्याला आणखीच गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनाही फायदा
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अंतर्गत रिंगरोड प्रस्तावित आहे. पुणे आणि पिंपरी पालिकेचे रिंगरोड एकमेकांना जोडले जात असून, त्यांचा आकार इंग्रजीतील 8 या अक्षरानुसार होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील रिंगरोडवरही निओ मेट्रो प्रस्तावित असून, या दोन्ही निओ मेट्रोचे प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार असल्याने दोन्ही शहरांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news