

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जनुकीय चाचणीतून नवीन व्हेरियंटचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. यामध्ये बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंटच्या 180 रुग्णांचा, तर बीए 2.75 व्हेरियंटच्या 175 रुग्णांचा समावेश आहे. ओमायक्रॉनच्या बीए 4, बीए 5 आणि बीए 2.75 या उपप्रकारांच्या संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरात जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तीव्र प्रभाव पुणे जिल्ह्यात साधारणपणे 4 ते 5 आठवडे जाणवला. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र, राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण अनुक्रमे पुणे (2924), मुंबई (2734), नागपूर (1175), ठाणे (1017) या चार जिल्ह्यांमध्ये आहेत. चारही जिल्ह्यांमधील रोजच्या कोरोनाबाधितांची संख्या 200 ते 400 च्या दरम्यान आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमधून दर पंधरा दिवसांनी 1000 ते 1500 नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.
सर्व रुग्णांचा शास्त्रीय आढावा
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार, रविवारी राज्यात बीए 4 चा 1, बीए 5 चे 2 आणि बीए 2.75 चे 16 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत. सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. नमुन्यांची तपासणी पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत बीए 4 आणि बीए 5 चे 275 आणि बीए 2.75 चे 250 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हानिहाय बीए 4 आणि बीए 5 चे रुग्ण…
पुणे-180, मुंबई-51, ठाणे-16, रायगड-7, सांगली-5, नागपूर-8, पालघर-4, कोल्हापूर-2
जिल्हानिहाय बीए 2.75 चे रुग्ण...
पुणे-175, नागपूर-33, यवतमाळ-12, सोलापूर-9, मुंबई-5, अकोला-6, ठाणे-3, वाशिम-2, अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर, सांगली-प्रत्येकी 1.