धक्कादायक ! जन्मदात्याकडूनच मुलाच्या खुनाची सुपारी; असा झाला उलगडा

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक कलह आणि मालमत्तेच्या वादातून बापानेच आपल्या पोटच्या मुलाची 75 लाखांत खुनाची सुपारी दिली. जंगली महाराज रस्त्यावर भर दुपारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सुदैवाने पिस्तुलातून गोळी झाडली न गेल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचा जीव वाचला होता. दरम्यान, या प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने लावला असून, त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रकरणी वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील (वय 64, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (वय 38, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय 48, रा. एरंडवणे), प्रवीण ऊर्फ पर्या तुकाराम कुडले (वय 31, सुतारदरा), योगेश दामोदर जाधव (वय 39) व चेतन अरुण पोकळे (वय 27) यांना पोलिसांनी अटक केली. धीरज दिनेशचंद्र अरडगे (वय 38,रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स या इमारतीच्या खाली भर दुपारी 16 एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर दुचाकीवर स्विगीचे टीशर्ट व हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पिस्तूल कॉक न झाल्याने गोळी झाडली गेली नाही. म्हणून धीरज यांचे प्राण वाचले. दरम्यान, सलग गोळीबाराच्या घटना घडत असल्याने शहरात एक दहशतीचे वातावरणही निर्माण झाले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्या वेळी युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती घेतली. त्यानुसार गुन्ह्याचा छडा लागला आहे.

प्रत्यक्ष गोळीबाराचा प्रयत्न करणारे प्रवीण कुडले आणि योगेश जाधव या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांच्या चौकशीत वडिलांची माहिती समोर आली. दरम्यान, धीरजला मारण्यासाठी पंधरा दिवसांपासून पाळत ठेवली होती. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहयक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, रंगराव पवार, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलिस अंमलदार आण्णा माने, नीलेश साबळे, अनिकेत बाबर, राजेंद्र लांडगे, अमोल आव्हाड, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.

वडिलांना 'ती' गोष्ट मान्य नव्हती

धीरज याचा पहिला घटस्फोट झाला आहे. 2021 मध्ये हा घटस्फोट झाला असून, त्यानंतर तो एका तरुणीसोबत लिव्हइनमध्ये राहत आहे. मात्र, ही गोष्ट वडिलांना मान्य नव्हती. त्यांचे याच्यासोबतच संपत्ती आणि कौटुंबिक कारणातून वाद-विवाद होत असत. धीरज नीट बोलत नसत. शिवीगाळ, एकेरी भाषेत बोलत असत. त्यामुळेच त्यांनी काही तरी बंदोबस्त करण्यासाठी विचार केला व घाडगे याच्या मदतीने खुनाचा कट रचला.

बांधकाम व्यावसायिकांवर 10 मार्चला हल्ला

बांधकाम व्यावसायिक यांच्यावर 10 मार्च रोजी सूस रोडला चाकूहल्ला झाला होता. हा हल्ला प्रवीण कुडले आणि चेतन पोकळे यांनी केला होता. त्याच दिवशी तक्रारदार यांचा खून करायचा होता. त्यानुसार हल्ला केला होता. पण, सुदैवाने ते यातून बचावले. दरम्यान, कुडले आणि पोकळे या दोघांनी दिनेशचंद्र आणि प्रशांत या दोघांना धीरज हल्ल्यात मेला, असे सांगून 20 लाख रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्ष पाहिले असता, दोघांना धीरज जिवंत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कुडले आणि पोकळे यांच्यासोबत दोघांचा वाद झाला. आरोपींनी उत्तर प्रदेश येथील दोघांना एक-एक लाख रुपये धीरज याला मारण्यासाठी दिले होते. परंतु, पोलिस पाठीमागे लागल्याचे सांगून त्यांनी पैसे घेऊन पळ काढला.

नशीब बलवत्तर म्हणून दोनदा जीव वाचला

धीरज अरगडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संपत्तीच्या वादातून दोन वेळा त्यांच्यावर हल्ला झाला, पण दोन्ही वेळा ते यातून बचावले. पहिल्यांदा हल्ला चाकूने झाला. दोघांनी त्यांच्यावर वार केले, पण ते बचावले. त्यानंतर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला, पण तेव्हाही पिस्तूल कॉक झाले नाही. त्यामुळे गोळी झाडली गेली नाही. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले.

जीपीएसद्वारे पाळत

धीरज यांच्याकडे चारचाकी गाडी आहे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी चक्क चारचाकी गाडीला जीपीएस बसविण्यात आले. त्यानुसार त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. घटनेच्या दिवशीही धीरज कार घेऊन ऑफिसमध्ये आल्याचे आरोपींना या जीपीएसद्वारेच समजले व त्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news