दौंडला गणेश थोरात कुठून उभे राहणार, याचीच चर्चा

दौंडला गणेश थोरात कुठून उभे राहणार, याचीच चर्चा

यवत; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर दौंड तालुक्यात 'कहीं खुशी कहीं गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हे कोणत्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार, ही रंगू लागली आहे. कारण, त्यांचा घरचा जिल्हा परिषद गट असणारा पारगाव-पिंपळगाव हा गट अनुसूचित महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे ते कुठे उभे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पंचायत समिती आरक्षणापेक्षा जिल्हा परिषद गटात नेमके काय आरक्षण निघते, याची तालुक्यात उत्सुकता होती.

जिल्हा परिषदेच्या आठ गटांपैकी पाच जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या झाल्या. यात राहू-खामगाव, गोपाळवाडी-कानगाव, लिंगाळी-देऊळगावराजे, पाटस-कुरकुंभ, वरवंड-बोरीपार्धी; तर यवत-बोरीभडक हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी, तर खडकी-राजेगाव व पारगाव पिंपळगाव हे गट अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. या सर्व आरक्षणामुळे त्या-त्या गटातील संभाव्य उमेदवार तयारीला लागले आहेत. गोपाळवाडी-कानगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार उमेदवारी मिळवून निवडणूक लढविणार का?

तसेच लिंगाळी-देऊळगावराजे या गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्याविरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार; शिवाय वरवंड-बोरीपार्धी हा गट देखील सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्याने या ठिकाणी उमेदवारीसाठी आणि निवडणुकीदरम्यान मोठी चुरस पाहायला मिळू शकते. खडकी-राजेगाव आणि यवत-बोरीभडक दोन्ही जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने या ठिकाणच्या खुल्या गटातील इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. एकंदरीत, पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांची संख्या जास्त असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशाच मुख्य लढती पाहायला मिळणार आहेत.

राहुल कुल कोणाला देणार उमेदवारी?
भाजप आमदार राहुल कुल यांचा राहू-खामगाव हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्याने आमदार राहुल कुल हे कोणाला उमेदवारी देतात, याकडे राहू खामगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news