दौंडमधील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
दौंड; पुढारी वृत्तसेवा: दौंड शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, दौंड नगरपालिका प्रशासन याकडे कोणतेही लक्ष देत नाही. शहरात जनावरांसाठी कोंडवाडा नसल्याने दौंड शहर व आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरे दिवसरात्र रस्त्याच्या मध्यभागी बसलेली असतात, त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. जनावरे शहरातील पोलिस स्टेशनसमोर, गोपाळवाडी रोड, सहकार चौक, भाजी मंडई, हुतात्मा चौक येथे रहदारीच्या वेळेस घोळका करून रस्त्याच्या मध्ये उभी असतात.
शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना जर एखादी दुखापत झाली तर याला कोण जबाबदार? दौंड नगरपालिका अनेकदा तक्रारी करून पाठपुरावा करून देखील शहरात कोंडवाडा बांधत नाही. या मागचे गौडबंगाल काय? ही जनावरे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र घाण करीत असल्याने दुर्गंधी पसरलेली असते. नगरपालिकेतील सफाई कामगारसुद्धा रस्त्यावर पडलेली ही घाण उचलण्याची तसदी घेत नाहीत. जनावरांमध्ये भांडणे जुंपलेली असतात.
एखादा दुचाकीस्वार किंवा ज्येष्ठ नागरिकाला किंवा आणखी कोणाला जर दुखापत झाली, तर याला दौंड नगरपालिका जबाबदार राहील, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. घोळक्याने राहणारी जनावरे गणपती मंडळासमोर ठेवलेल्या कुंड्या किंवा हरळी, याकडे जाऊन एखादा अनुचित प्रकार घडला तर काय करणार? तत्पूर्वी, दौंड नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.

