दौंडज खिंडीत भरला वैष्णवांचा मेळा; परिसरातील नागरिकांनी दिली भाजी-भाकरीची न्याहरी

दौंडज खिंडीत भरला वैष्णवांचा मेळा; परिसरातील नागरिकांनी दिली भाजी-भाकरीची न्याहरी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्री खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीतील मुक्कामानंतर सोमवारी (दि. 27) सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीचा निरोप घेतला. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा दौंडज खिंडीत न्याहारीसाठी विसावला. परिसरातील शेतकर्‍यांनी आणलेल्या भाजी-भाकरीची न्याहारी घेऊन पालखी सोहळा वाल्मीकी ऋषींच्या कर्मभूमी वाल्हेकडे मार्गस्थ झाला.

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदी-पंढरपूर मार्गावर जेजुरीच्या खंडोबादेवाच्या राजधानीत रविवारी (दि. 26) मुक्कामी होता. शिव आणि वैष्णवांच्या मिलाफाने आणि खंडोबादेवाचे लेणे कपाळी लावून सुखावलेल्या वारकरी बांधवांनी सकाळी सात वाजता जेजुरीनगरीला खंडोबादेवाचा जयघोष करीत निरोप दिला. जेजुरीपासून चार किलोमीटर अंतरावर असणार्‍या दौंडज खिंडीत हा सोहळा विसावला. जेजुरी व परिसरातील शेतकरी बांधवांनी सोबत आणलेली भाजी-भाकरीची न्याहारी करताना

'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी,
लसून मिरची कोथंबिरी, अवघी व्यापिली पंढरी'

या संत सावतामाळी यांच्या अभंगाचे सूर या वेळी गायले गेले. संपूर्ण दौंडज खिंडीत, डोंगर परिसरात वारकरी भाविक विसावला होता. हे दृश अतिशय विलोभनीय होते. तासाभराच्या विसाव्यानंतर माउलींचा सोहळा विठोबा-रखुमाईचा जयघोष करीत पंढरीच्या वाटेवर वाल्हेकडे मार्गस्थ झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news