

खोर : पुढारी वृत्तसेवा : उपसा जलसिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने दौंडच्या दक्षिण भागातील अनेक गावे अध्यापही या पाण्यापासून वंचित राहात असल्याचे विधानसभेत दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता 13835 हेक्टर असून, पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता ही 25753 हेक्टर इतकी आहे. दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून या दोन्ही सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जनाई- शिरसई योजनेसाठी 3.60 टीएमसी तर पुरंदर योजनेसाठी 4 टीएमसी पाणी राखीव करण्यात येऊनदेखील पुरेशा प्रमाणात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात नाही.
योजना सुरू होऊन पूर्ण क्षमतेने चालू नाही, योजनेसाठी करण्यात आलेल्या जलवाहिनाला मोठ्या प्रमाणात गळती आहे, असेही आ. कुल यांनी विधानसभेत सांगितले. जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार करून दिलेले पाझर तलाव, लघू पाटबंधारे तलाव यांची संख्या कमी असल्याने त्या गावामधील काही समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याची अशा तलावांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी कुल यांनी केली. खोर गावाच्या डोंबेवाडी तलावात बंद नळीतून पाणीपुरवठा करून पाण्यासाठीचा मोठा संघर्ष या भागातील गावांचा कायमस्वरूपी थांबवावा, अशी मागणी या वेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.
जनाई-शिरसाई व पुरंदर योजना दौंड तालुक्यातील गावांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे व सिंचन योजनेच्या अडचणी आ. राहुल कुल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत व फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली, तसेच फेरसर्वेक्षण करताना आवश्यक असेल त्या ठिकाणी सुधारित मान्यता देऊन जनाई-शिरसाई, पुरंदर योजनेच्या पूर्वेच्या ताम्हणवाडीपासून शेवटच्या जिरेगाव कौठडीपर्यंतची सर्व कामे पूर्ण करून, विशेष बाब म्हणून हे तलाव जोडण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.