दोन वर्षांनंतर पुणे गणेशमय; मानाच्या गणपतींची लक्षवेधी मिरवणूक, मुहूर्तावर प्रतिष्ठापना

गणपती
गणपती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सनई-चौघड्याचे मधुर सूर…बँड पथकांतील कलाकारांचे भारावून टाकणारे वादन, 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अन् पारंपरिक वेशभूषेत गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन गेलेले कार्यकर्ते अशा चैतन्यपूर्ण अन् आनंदी वातावरणात कोरोनाचे विघ्न टळल्याने दोन वर्षांनंतर जल्लोषात उत्सव साजरा करणारे पुणे शहर गणेशमय झाले. मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या पारंपरिक मार्गावरून निघालेल्या मिरवणुकांनी पुणेकरांचे लक्ष वेधले अन् मंत्रोच्चाराने भारलेल्या वातावरणात मानाच्या आणि प्रमुख गणपतींची सुमुहूर्तावर विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाचा पहिला
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
श्री कसबा गणपती मंडळाची परंपरेप्रमाणे मिरवणूक काढून गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सव मांडवात आणण्यात आली. सनई चौघडा, प्रभात बँड पथक तसेच संघर्ष, वाद्यवृंद आणि श्रीराम या तीन ढोल-ताशा पथकांच्या निनादात मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि धैर्यशील राजगुरू यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना विधिवत पद्धतीने करण्यात आली. एक वेगळाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.

मानाचा दुसरा
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीचे चांदीच्या पालखीतून उत्सव मंडपात आगमन झाले. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आणि त्यांच्या पत्नी मीरा काळे यांच्या हस्ते दुपारी दीड वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नगारा वादन, न्यू गंधर्व बँड पथक, शिवमुद्रा आणि ताल ढोल-ताशा पथक आणि विष्णूनाद शंख पथकांचा समावेश होता, अन् आगळ्या-वेगळ्या मिरवणुकीने पुणेकरांची मने जिंकली. गोंधळींच्या पथकातील संबळवादक आणि ताशावादक यांची अनोखी जुगलबंदी मिरवणुकीत गणेशभक्तांना एक वेगळीच अनुभूती देऊन गेली.

मानाचा तिसरा
गुरुजी तालीम मंडळ
कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अन् गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने दिसणारे आनंदी वातावरण उत्सव मंडपाच्या ठिकाणी दिसून आले, तर मंडळाच्या मिरवणुकीतही वेगळेपण पाहायला मिळाले. गणरायाची प्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी करण्यात आली. सुभाष सरपाले आणि स्वप्निल सरपाले यांनी साकारलेल्या आकर्षक पुष्पसजावटीच्या रथातून गणपतीची मिरवणूक निघाली. नगारावादन, अतुल बेहरे यांचे नादब्रह्म महिलांचे ढोल-ताशापथक, गर्जना, गुरुजी प्रतिष्ठान आणि येरवडा येथील श्री ही ढोल-ताशापथके मिरवणुकीत सहभागी झाली होती.

मानाचा चौथा
श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट
स्वानंदलोक महालाची प्रतिकृती असलेल्या सरपाले बंधू यांनी साकारलेल्या पुष्परथातून श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघाली अन् गणरायाला उत्सव मंडपात नेतानाचे क्षण पुणेकरांनी आपल्या डोळ्यांत साठवून घेतले. शिवगर्जना, समर्थ आणि उगम या तीन ढोल-ताशा पथकांच्या कलाविष्काराने गणेशभक्तांना खिळवून ठेवले. गणपती चौकातून कार्यकर्त्यांनी उचलून उत्सव मंडपामध्ये आणलेल्या गणरायाच्या मूर्तीची उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरीवाडा
पालखीतून गणरायाच्या मूर्तीचे केसरीवाड्यातील उत्सव मंडपात आमगन झालेल्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या गणरायाची प्रतिष्ठापना डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता झाली. डॉ. दीपक टिळक, डॉ. प्रणिती टिळक, डॉ. गीताली टिळक हे उपस्थित होते. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये बिडवे बंधू यांचे नगरावादन, श्रीराम पथक आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news