देहूरोड : यात्रेसाठी प्रशासन सज्ज

देहूरोड : यात्रेसाठी प्रशासन सज्ज

देहूरोड : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आषाढीवारी 337 वा पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पडावा; तसेच याठिकाणी येणार्‍या भाविक, वारकर्‍यांच्या सोयी सुविधाच्या पार्श्वभूमीवर नियोजन आढावा बैठक हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली भक्तनिवास येथे नुकतीच पार पडली.

हवेलीचे अपर तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, देहूरोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले, वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आदी या वेळी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे (पीएचसी) वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी माहिती देताना सांगितले की, टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंदिर,वैकुंठ गमनमंदिर, गाथामंदिर अशा तीन ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण केंद्र सुरु केले जाणार आहे. या केंद्रांवर कोविड तपासणी (रॅपिड टेस्ट) ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 10 रुग्णवाहिका,27 डॉक्टर, 60 कर्मचारी वारकर्‍यांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असतील.

मेडिक्लोर आणि 400 प्रथमोपचार किट उपलब्ध करण्यात आले आहे. नगरपंचायतीकडून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे या वेळी व्यक्त करण्यात आले. देहूत असणार्‍या सर्व खाजगी रुग्णालयातील उपलब्ध बेडची संख्या अहवाल प्राप्त करून वारकरी भाविकांसाठी राखीव बेड करण्याच्या सूचना प्रांत असवले यांनी यावेळी दिल्या. देहूमध्ये चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे अक्षय रोकडे यांनी बैठकीत दिली.

इनामदार वाड्यात पालखी मुक्कामानंतर मार्गस्थ होताना गर्दी होत असल्याने बॅरेकेट व दोरखंड लावण्याचे तसेच वारकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करण्याचे आवाहन डॉ. विवेक मोरे यांनी केले. अनगडशहा दर्ग्याजवळ सोहळ्यातील पहिली आरती होते. या ठिकाणी गर्दी होत असल्याने दर्ग्याजवळची भिंत काढण्याची मागणी संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजित मोरे यांनी केली.

पालखी सोहळा मार्गावर स्वागत कमानी उभारण्याचे तर भक्तिमय वातावरणसाठी भजनी मंडळाकडून अभंग व भक्तिगीते ध्वनी प्रदूषण न करता लावण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केले. पालखी प्रस्थानपूर्वी म्हणजे रविवार (दि. 19) ते पालखी मार्गस्थ होईपर्यंत मंगळवार (दि. 21) पर्यंत देहूत प्रवेश करणार्‍या सर्व मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. तसेच मंगळवारी (दि.21 ) देहू – देहूरोड दरम्यानचा मार्ग सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.

पालखी प्रस्थान आणि मार्गस्थ दिनी सोमवार व मंगळवारी देहूत प्रवेश करणार्‍या सर्व मार्गावर खंडेलवाल, परंडवाल व भैरवनाथ चौक तसेच चाकण- तळेगाव महामार्गालगतचा देहूफाटा मार्ग बॅरिकॅट लावून बंद करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक नियंत्रक तळवडे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून पालखी सोहळा न झाल्याने यंदा पालखी सोहळ्यासाठी अधिक प्रमाणात वारकरी येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देहूमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त बंदोबस्तासाठी दाखल झालेले
पोलिस कर्मचारी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news