

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'पनवेल येथील भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत मराठा आरक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणणे हे दुर्दैवी असून वेदनादायी आहे,' असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी व्यक्त केले. अॅड. पवार म्हणाले, 'युती सरकारच्या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना तत्काळ आरक्षण देण्याचे जाहीर केले होते व ते तत्काळ लागू करू असेही म्हटले होते.
ओबीसी आरक्षण झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशा गर्जना करणारे मराठा आरक्षणावर उदासीन का ? असा सवाल करून सर्वच राजकीय नेत्यांनी मराठा समाजाचा वापर केला आहे; पण समाज आता जागृत झाला असून यापुढे हे सहन केले जाणार नाही.' ओबीसींच्या 50 टक्के आतील आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे मूक आत्मक्लेश आंदोलन करू, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला.
मराठा आरक्षणाबाबत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडणार्या विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडणार्या आणि मराठा आरक्षणाची मागणी त्यावेळी प्रकर्षाने लावून धरणार्या या मंडळींनी आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसीमधूनच मराठा आरक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर घेण्यासाठीची जबाबदारी घेतली पाहिजे, अन्यथा मराठा आरक्षण मुद्द्यावर त्यांची भूमिका दुटप्पी होती, हे सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.