खोर; पुढारी वृत्तसेवा: देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य व माजी सरपंच विशाल बारवकर व अक्षय बारवकर यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंचांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही परस्परविरोधी तक्रारी आल्याने पाटस पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पाटसचे पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, देऊळगावगाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी (दि. 25) मासिक बैठक सुरू असताना संतोष विक्रांत मोरे यांनी बुद्धविहारसमोर बसविलेले पेव्हर ब्लॉक हे निकृष्ट दर्जाचे असतानाही बिल कसे निघाले, असे सरपंचांना विचारले. तेव्हा तेथे बसलेले ग्रामपंचायत सदस्य विशाल बारवकर यांनी 'तू हा विषय येथे काढू नको, हा अजेंड्याचा विषय नाही, ते काम व्यवस्थित झालेले आहे. तुझी लायकी नाही, बैठक संपल्यावर तुला बघून घेतो, असे बोलत मी बिल काढले आहे, तुला काय करायचे ते कर, असे जातिवाचक व अपमानास्पद बोलणे केले व त्यानंतर दुसरे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर हे दोघे उठून माझ्या अंगावर धावून आले, अशी फिर्याद संतोष मोरे यांनी दिली आहे.
विशाल बारवकर व अक्षय बारवकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. संतोष विक्रम मोरे, सोमनाथ दिंगबर मोरे, अरविंद विठ्ठल मोरे व सचिन विक्रम मोरे (सर्व रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये सरकारी पैशांचा अपहार केल्याने त्याच्याबद्दल चर्चा होऊन त्यांच्यावर निलबंन करण्याचा ठराव मंजूर केला. या कारणावरून आरोपींनी सरपंचांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून हात धरून खुर्चीवरून बाजूला केले, तर रस्त्यावर उभ्या असताना आरोपींनी तिथे येऊन विनयभंग केल्याची तक्रार त्यांनी पाटस पोलिस ठाण्यात दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.