दिल्ली असो की गल्ली,‘बडवे’ डोईजड होतातच कसे?

दिल्ली असो की गल्ली,‘बडवे’ डोईजड होतातच कसे?
Published on
Updated on

निमोणे; पुढारी वृत्तसेवा: राजकारण दिल्लीचे असो की गल्लीचे; ज्या नेतृत्वाला विठ्ठल मानून वाटचाल केली, त्याच्यापासून दूर जाताना प्रत्येक जण '…आमच्या विठ्ठलाला बडव्यांचा वेढा पडला,' हेच कारण सांगून बाहेर पडतो? दिल्ली, मुंबईच्या घडामोडी सामान्य माणूस फक्त ऐकतो. त्यातील खाचाखोचा त्याला माहीत नसतात. मात्र, आपल्या गावात, तालुक्यात घडणार्‍या प्रत्येक बारीकसारीक घटनांचा तो मूक साक्षीदार असतो. जे दिल्लीत घडते, त्याच्यापेक्षा कुटिल गल्लीत घडत असते. मात्र, दिल्लीला वारेमाप प्रसिद्धी मिळत असल्यामुळे तो विठ्ठल… ते बडवे… सतत चर्चेत येतात. गल्लीतील विठ्ठल अन् बडवे कितीही कारनामे करू द्या, निष्ठावंतांना तोंड दाबून बुक्क्यांचा माराच सोसावा लागतो. गावगाड्यातला विठ्ठल नावारूपाला आला, की हळूहळू त्याच्यासभोवताली बडव्यांचा वेढा पडत जातो.

गावात जरी तो विठ्ठल असला, तरी तालुक्याच्या राजकारणात त्याला बडवा म्हणूनच जडणघडणीच्या काळात जागा तयार करावी लागते. अशा असंख्य बडव्यांचे कडे तोडून थेट तालुक्याच्या विठ्ठलाचा ताबा घेणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी कधी खरे, कधी खोटे, जसे जमेल तसे तालुक्याच्या नेत्याच्या कानात सतत दुसर्‍याबद्दल विष ओकण्याचे धंदे आहोरात्र सुरू ठेवावे लागतात. लग्न, दशक्रिया आदी ठिकाणी विरोधी पक्षाचा मातब्बर नेता भेटला, तर माणुसकी धर्म म्हणून बोलणे होणारच. पण, याच गोष्टीचे भांडवल करून नेत्याच्या मनात त्या कार्यकर्त्यांंबद्दल दुहीचे बीज पेरण्याचे काम बडवे मंडळी अतिशय चलाखीने करतात. तो कार्यकर्ता कितीही प्रमाणिक असो, लोकांच्या संपर्कातील असो.

पण, त्याची विरोधकांशी जरा सलगीच आहे, या एकाच मुद्द्यावर बहुतांश निष्ठावंत मंडळी या बडव्यांनी नेत्यांपासून दूर केली. एखाद्या गावात नेता आला, बडवे सोडून दुसर्‍या कार्यकर्त्यांशी बोलला, तर या बडव्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. कधी एकदा कार्यक्रम संपतो. नेता गावाबाहेर जातो अन् मी फोन करतो, याची ते वाटच पाहत असतात. हॅलो, कार्यक्रम चांगला झाला. पण, तुम्ही 'त्याच्याशी' कशाला बोलला. अहो, तो आतून आपला नाही. त्याने विधानसभेला त्यांचे काम केले, झाले.

एखादी बायको नवर्‍यावर लक्ष ठेवणार नाही एवढे लक्ष ही बडवे मंडळी नेत्यावर देत असल्यामुळे नेत्याची ताकद दिवसेंदिवस कमी होत जाते. मात्र, बडवे सगळे पॅक केले, काहीच अडचण नाही, या वेड्या स्वप्नातच नेत्याला पाच वर्षे बांधून ठेवतात, हे वास्तव आहे. राजकारणातील विठ्ठलाने खरोखरंच बडवे ओळखायला शिकले पाहिजे. जर बडवे असेच डोईजड झाले, तर निष्ठावंत दूर जातील अन् बडवे कालही तुमचे नव्हते अन् आजही तुमचे नाहीत. ते सकाळी पूर्व भागात फोन करीत असले, तरी रात्री पश्चिम भागाशीही संबंध ठेवून आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news