थ्रीडी प्रिंटिंगमुळे उत्पादनाला दिशा; उद्योगधंद्याची अचूक, दर्जेदार, आकर्षक उत्पादननिर्मितीकडे वाटचाल

थ्रीडी प्रिंटिंगमुळे उत्पादनाला दिशा; उद्योगधंद्याची अचूक, दर्जेदार, आकर्षक उत्पादननिर्मितीकडे वाटचाल
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे : ओबडधोबड वस्तूंच्या निर्मितीपासून आता अचूक, दर्जेदार, आकर्षक उत्पादननिर्मितीकडे उद्योगधंद्याची वाटचाल सुरू झाली आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे भविष्यातील उत्पादनांची दिशाच बदलणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कमीत कमी कच्च्या मालामध्ये हवे ते उत्पादन मशिनच्या माध्यमातून थ्रीडी प्रिंटिंग अर्थात त्रिमिती मुद्रणाचा उपयोग करून तयार करण्याकडे उद्योगधंद्यांचा कल वाढला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही कोणत्या तरी उत्पादन प्रक्रियेतून निर्माण केलेली असते. मागच्या तीन शतकांमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. उद्योगांची भरभराट, वाढती मागणी, जागतिकीकरण, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी यामुळे कमी वेळात, कमी खर्चात मोठ्या संख्येने उत्पादने निर्माणासाठी प्रक्रियांचा शोध सुरू झाला आहे.

पारंपरिक उत्पादन प्रक्रिया या कच्च्या मालाच्या विभाजनावर अवलंबून होत्या, कच्च्या मालाचा जास्तीच्या मापाचा ठोकळा घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यापासून हव्या त्या आकाराची आणि मापाची वस्तू बनविली जायची; परंतु यामध्ये खूप कच्चा माल वाया जात होता. दुसरा तोटा म्हणजे कच्च्या मालाप्रमाणे योग्य ती प्रक्रिया निवडावी लागायची; परंतु आता उत्पादननिर्मितीमध्ये त्रिमिती मुद्रण तंत्रज्ञान आले आहे. ज्याने उत्पादनांची परिभाषाच बदलली आहे. या प्रक्रियेत निर्माणाधीन वस्तूच्या संगणक आधारित रचनेचे, अगदी सूक्ष्म स्तरांमध्ये विभाजन करून कच्च्या मालाचा एकेक स्तर अगदी तंतोतंतपणे एकमेकांवर रचनेप्रमाणे अंथरून वस्तूला आकार दिला जातो. स्तरीकरणातून उत्पादन केल्याने कच्चा माल कुठेही वाया जात नाही, ही सगळ्यात मोठी सकारात्मक बाब तर दुसरा फायदा म्हणजे, वस्तुसापेक्षा साधनांची, सामग्रीची गरज या तंत्रज्ञानासाठी लागत नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास भविष्यातील उत्पादनांची दिशाच बदलणार आहे.

विद्यार्थ्यांना काय आहेत संधी
त्रिमिती मुद्रणासाठी वेगवेगळ्या क्षमतेसाठी यंत्रनिर्मितीची नितांत गरज
विशिष्ट धातूसाठी प्रक्रिया संशोधन अणि यंत्रणा विकास यात संधी
वैद्यकीय क्षेत्रात त्रिमितीनिर्मित अवयवरोपण यात संशोधन संधी
त्रिमिती मुद्रणाच्या माध्यमातून क्लिष्ट अशा वस्तू निर्माण करता येतील

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी
त्रिमिती मुद्रणाचा उपयोग यांत्रिक अभियांत्रिकी पुरता मर्यादित न राहता, टिश्यू इंजिनिअरिंगपासून ते स्थापत्य अभियांत्रिकीपर्यंत होतोय. त्रिमिती तंत्रज्ञानामुळे भविष्यात उत्पादनाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने यंत्र अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि अणुविद्युतच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

त्रिमिती मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर हा वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने होत आहे. दंतचिकित्सा, हाडांच्या विकृतीच्या उपचारासंबंधी उपचार, अवयवरोपण ही प्रमुख उपक्षेत्रे आहेत. त्रिमिती मुद्रण अनुकूल नवनवीन बायो-मटेरिअलचे संशोधन, प्रक्रिया विकास, यात भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

– प्रा. डॉ. योगेश भालेराव, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया नॉर्विक, युनायटेड किंग्डम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news