तोरणा खोर्‍यात पावसाची संततधार सुरूच, गुंजवणी धरणातून विसर्ग

तोरणा खोर्‍यात पावसाची संततधार सुरूच, गुंजवणी धरणातून विसर्ग

Published on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : तोरणा खोर्‍यासह धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने शंभर टक्के भरलेल्या धानेप येथील गुंजवणी धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. साखर येथील पूल पाण्यात बुडाल्याने पर्यटकांसह राजगड खोर्‍यातील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. गुंजवणी धरणातून गुरुवारी 7850 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे कानंदी व गुंजवणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्या, ओढ्याच्या काठावर असलेली भात व इतर पिके पाण्यात बुडाली आहेत.

तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले, 'वेल्हे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. गुंजवणी धरणातून जादा पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या काठावरील शेतकरी, रहिवाशांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.' आस्कवडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब दसवडकर म्हणाले, 'नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीरालगतची शेती व पिके पाण्याखाली बुडाली आहेत.

ओढ्या, नाल्यांना पूर
वेल्हे तालुक्यात बुधवारच्या (दि. 10) तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर कमी होता. मात्र, गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरण माथ्यावरील धानेप येथे दिवसभरात 29 मिलिमीटर पाऊस पडला. धरणक्षेत्रातील घिसर, निवी, कोदापूर, घेेवंडे, अंत्रोली भागातील ओढे- नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पर्यटकांसह नागरिकांचे हाल
मुसळधार पावसामुळे गुंजवणी धरणातून बुधवारपासून (दि. 10) पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीच्या पुरात साखर-मार्गासनी येथील पूल पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे राजगडावर जाणार्‍या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे हाल सुरू आहेत. मुख्य रस्ता बंद असल्याने आस्कवडी तसेच खरीव मार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.

नदीवरील नवीन पुलाचे काम रेंगाळले आहे. जुन्या पर्यायी रस्ता पुलासह बुडाल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी, पर्यटकांना वळसा घालून खड्डे पडलेल्या खरीव, कोदवडी, आस्कवडी येथील धोकादायक रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
                                                            – योगेश रांजणे, ग्रामस्थ

धरणक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची पातळी 99.38 टक्के इतकी आहे. पावसाच्या प्रमाणानुसार नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
-दिगंबर डुबल, कार्यकारी अभियंता, निरा देवघर जलसंपदा विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news