

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: तिन्हेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह वाहनचालकांच्या वतीने सोमवारी (दि. 15) राजगुरूनगर नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेखर भिकाजी पाचारणे यांनी दिला आहे. राजगुरूनगर परिसरातील तिन्हेवाडी रस्ता बंदिस्त गटर योजनेसाठी दोन वर्षांपूर्वी नगरपरिषदेने खोदला होता. त्यानंतर तात्पुरती डागडुजी केली. मात्र, रस्त्याच्या एक किलोमीटर अंतरावर केलेल्या डांबराचा थर उखडून गेला असून आता त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
नागरिकांना पायी चालणे अवघड बनले आहे. शहरातील या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस स्थानक आवारात वाहतूक कोंडी झाल्यावर तिन्हेवाडी रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून नागरिक वापर करतात. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे, असे नगरपरिषदेकडून सांगितले जात आहे.
मात्र, सध्या लहान दगड, मुरुमीकरण करून रस्त्यावरील खड्डे भरून काढावेत, अशी मागणी शेखर पाचारणे व तिन्हेवाडीच्या नागरिकांनी पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. मात्र, अद्यापही दखल घेण्यात न आल्याने तिन्हेवाडीतील नागरिकांच्या वतीने सोमवारी (दि. 15) नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाऊस थांबला की, मुरुमीकरण करण्यात येईल, असे आठ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण ठेकेदार मिळाला नाही. लवकरात लवकर खड्डे बुजवले जातील.
– निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी, न.प.राजगुरूनगरदेशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र, आम्ही चिखल तुडवीत घर गाठायचे हे अयोग्य आहे. राजगुरूनगर नगरपरिषदेने शासकीय उपक्रमाचा देखावा करताना नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले आहे.
– शेखर पाचारणे, ग्रामस्थ, तिन्हेवाडी