

अशोक मोराळे
पुणे : चालू वर्षातील सहा महिन्यांत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने 66 तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेन, गांजा, ब्राऊन शुगर, चरस, मेफेड्रोन (एमडी), एमडीएमए असे तब्बल 1 कोटी 16 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात गांजाची तस्करी करणार्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे असले तरी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी तस्करीचे प्रयत्न हाणून पाडत त्यांच्या तस्करीची झिंग उतरवली आहे.
सांस्कृतिक शहर म्हणून आपली ओळख निर्माण करणार्या पुणे शहराचा वाढता नावलौकिक पाहता, शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गडगंज पगाराच्या नोकर्या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती, मद्याबरोबरच अमली पदार्थांची नशेखोरी, त्यामुळे मुंबईपाठोपाठ अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर पुणे शहर असतानाच पुणे पोलिसांनी अशा अमली तस्करांचे प्रयत्न हाणून पाडत त्यांना जेलची हवा खायला लावली आहे.
पोलिसांनी अडीच वर्षांत अमली पदार्थविरोधी कारवाया करताना 191 गुन्ह्यांमध्ये 269 अमली पदार्थ तस्करांना जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 5 कोटीपेक्षा अधिक रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महिला तस्करांनादेखील अटक करण्यात आली आहे. गांजा व कोकेनची तस्करी करताना महिला तस्कर आढळल्या आहेत.
उपनगरात वाढतोय तस्करांचा अंमल…
शहरातील अमली पदार्थ तस्करांनी आपला मोर्चा उपनगरात वळविल्याचे दिसून येते. सहज पद्धतीने अमली पदार्थांची तस्करी, माल साठवून ठेवण्यासाठी सुरक्षित जागा, पोलिसांना सुगावा लागला, तर सहज पलायन करण्यासाठी मार्ग, शिवाय खर्चदेखील कमी अशा विविध कारणांमुळे अमली तस्कर उपनगराला प्राधान्य देत आहेत. पोलिसांनी कोंढवा, लोणीकंद, बाणेर-बालेवाडी, फुरसुंगी आणि लोणी काळभोर परिसरात केलेल्या कारवाईवर हे पुन्हा एकदा दिसून आले. नायजेरियन तस्करांनीदेखील त्यांचे बस्तान उंड्री-पिसोळीसारख्या उपनगरीय भागात बसविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपनगरात अमली तस्करांचा अंमल वाढत असल्याचे चित्र आहे.
पोलिसांचा तस्करांच्या कुंडलीवर वॉच
पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी दहा वर्षांत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार केली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात येतो आहे. सध्या ते काय करत आहेत?, त्यांचे वास्तव्य कोठे आहे?, अमली पदार्थांची विक्री करत आहेत का? अशा विविध बाबींची त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. त्यात काही तस्कर कारागृहात बंद असल्याचे तर अनेकांचा वास्तव्याचा पत्ता बदललेला दिसून आला. काही जण परत तस्करी करत असल्याचे निदर्शनास आले. काहींनी हा व्यवसाय सोडल्याचेदेखील दिसले.
अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहा महिन्यांत 49 गुन्हे दाखल करून 66 अमली तस्करांना अटक केली आहे. कॉलेज, महाविद्यालये परिसरात पथकांचे विशेष लक्ष आहे. तरुणाईने अमली पदार्थांच्या नशेपासून दूर राहावे. अमली पदार्थ विक्री करणार्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा