पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासदार म्हणून केवळ 'संसदरत्न' पुरस्कार मिळविण्यापेक्षा पंधरा वर्षांत सर्वसामान्यांच्या हिताची कामे केली असती तर आज प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब उतरविण्याची वेळ आली नसती. आणखी कोणी लहानसहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला. भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे याही प्रचारात उतरल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी आणून केलेली कामे सांगून सुळे यांच्याकडून कामांवर डल्ला मारला जात असल्याचाही आरोप केला. महाविकास आघाडीत असताना महागाईविरोधात आंदोलन करणार्या चाकणकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे गुणगान गायले. त्याचवेळी स्वयंपाकाच्या गॅससिलिंडरचे भाव कमी झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिलांसाठी राबविलेल्या योजनांचा पाढा वाचला. मणिपूरच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्या वेळीही आम्ही निषेध केला आणि आजही निषेध करतो, असेही चाकणकर म्हणाल्या.
हेही वाचा