…तर वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो न काढण्याच्या सूचना

…तर वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो न काढण्याच्या सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना आता वाहतूक पोलिसांना स्वतःच्या (वैयक्तिक) मोबाईलमध्ये वाहनचालकांचे फोटो काढता येणार नाहीत. फक्त ई-चलान मशिनद्वारेच फोटो काढून कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जे वाहतूक पोलिस कारवाई करताना आदेशाचे पालन करताना दिसून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिले आहेत.

ऑगस्ट महिन्यात एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहिती अधिकाराखाली याबाबत माहिती मागविली होती. मात्र, त्या पूर्वीच 2020 मध्ये वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटकप्रमुखांना व नोडल अधिकार्‍यांना पत्राद्वारे वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर न करता ई-चलान मशिनद्वारेच सर्व कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीदेखील त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकड़ून होताना दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपर पोलिस महासंचालक वाहतूक विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक विभागाकडून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सीसीटीव्हीबरोबरच वाहनचालकांचा मोबाईलमध्ये फोटो काढून वाहतूक पोलिस कारवाई करतात. मात्र, ही कारवाई करत असताना, वाहतूक पोलिस स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये फोटो किंवा चित्रीकरण नियमांचे उल्लंघन केल्याचा पुरावा म्हणून काढतात.

त्यानंतर ते काही कालावधीनंतर ई-चलान मशीनमध्ये अपलोड करतात. तसेच गाडीचा संपूर्ण फोटो न टाकता केवळ नंबर प्लेटचा फोटो टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखण्यास अडचणी निर्माण होतात. याबाबतचा माहिती अधिकार कार्यकर्त्याने केलेला अर्ज अपर पोलिस महासंचालक कार्यालय वाहतूक विभाग मुंबई येथे प्राप्त झाला होता, त्यामुळे नव्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

ई-चलान मशिनचाच वापर
यापुढे वैयक्तिक मोबाईलचा कारवाईच्या वेळी फोटो काढण्यासाठी वापर न करता ई-चलान मशिनचाच वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ई-चलान मशिनच्या बाबतीत काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्या संबंधित कंपनीकडून दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news