डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडून विद्यार्थी घडविण्याचे देशकार्य

डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडून विद्यार्थी घडविण्याचे देशकार्य
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाचा अधिकार देताना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे सध्याची गरज आहे. ज्ञान, बुद्धी आणि आपल्या क्षमतांचे संवर्धन करणारे शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण आणि त्यातून उज्ज्वल भविष्य हे समीकरण जुळविण्याचे काम डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले असून, हे देशकार्य आहे, असे गौरवोद्गार पद्मविभूषण आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

डॉ. पी. डी. पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. पिंपरी-संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात हा सोहळा झाला. डॉ. माशेलकर यांच्या हस्ते डॉ. पी. डी. पाटील यांना सन्मानपत्र, शाल, श्रीगणेशाची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.

बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पाटील यांचे प्रेक्षागृहातून ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले यावेळी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. 70 दीपज्योतींनी त्यांचे औक्षण आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

माशेलकर म्हणाले, "डॉ. पी. डी. पाटील यांनी सर्वांवर प्रेम केले. त्यांनी माणसे जोडली. ते मितभाषी आहेत. त्यांची आकलनक्षमता उत्तम आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उत्तम काम झाले आहे."

शिंदे म्हणाले, "डॉ. पी. डी. पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. त्यांचे मेडिकल कॉलेज पहिल्यांदा पाहिले तेव्हा थक्क झालो होतो आणि देश-विदेशातही मी या कॉलेजचे उदाहरण देतो. त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्याकडे एक वेगळीच शक्ती आहे. ते स्वत: संशोधक आहेत. चांगल्याची जाण त्यांना आहे, म्हणूनच साहित्य क्षेत्रासाठीही त्यांनी पुढाकार घेत संमेलन घेतले. माजी संमेलनाध्यक्षांची परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांनी 5 लाखांचा निधी देऊन मोठी दानत दाखविलेली आहे. समर्थपणे साथ देणार्‍या त्यांच्या पत्नी भाग्यश्रीताई पाटील यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कामाची इतिहासात नोंद होईल."

डॉ. मोरे म्हणाले, "डॉ. पी. डी. पाटील हे शिक्षण क्षेत्रातील आंत्र्यप्रेनर आहेत. काही तरी नवीन आणि दर्जात्मक शिक्षणासाठी त्यांचा भर असतो. शिक्षण आणि आरोग्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे."

काव्य आणि किस्से सांगत डॉ. मिश्रा यांनी भावनावश केले. ते म्हणाले, "डॉ. पी. डी. पाटील हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यासारखा मित्र मिळणे हे माझे प्रारब्ध आहे. केवळ शिक्षण हक्क नव्हे, तर दर्जात्मक शिक्षणाची संधी त्यांच्यामुळे सर्वसामान्य मुलांना मिळाली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कोहिनूर हिर्‍यासारखी झळाळी आहे."

डॉ. योगेश जाधव म्हणाले, "डॉ. पी. डी. पाटील यांनी नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्यांच्या ठायी मोठेपणाचा रेड कार्पेट आहे. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कर्तृत्वातून आघाडी घेतली आहे."

डॉ. स्मिता जाधव यांनी याप्रसंगी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी डॉ. पी. डी. पाटील स्कॉलरशिपची घोषणा केली. डॉ. सोमनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. युवराज शहा यांनी मानपत्राचे लेखन व वाचन केले. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.

चांगली माणसं भेटली; घडत गेलो : डॉ. पी. डी. पाटील

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आशीर्वाद आणि प्रवासात मिळालेली चांगली माणसे, यामुळे आजपर्यंतची वाटचाल उत्तम झाली, असे सांगताना डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, "या गौरव समारंभाने भारावून गेलो आहे. खरे तर मी इथवर पोहोचेन, असे कधी वाटले नव्हते; पण संधी मिळेल तिथे चांगले काम करत गेलो. पिंपरीतील मेडिकल कॉलेजची उभारणी 8 महिन्यांत करण्याचे आव्हान मी पूर्ण केले. सर्वोत्तम काम करण्याच्या ध्यासातून मी सतत कार्यरत राहिलो. विविध संस्थांची उभारणी उत्तम पद्धतीने करण्यावर भर दिला. माझ्यावर असेच प्रेम राहू दे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news