डेंग्यू रुग्णांची संख्या यंदा जूनमध्ये कमी
पुणे : पुढारी वृत्तसेवा: दरवर्षीप्रमाणे यंदा जूनमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले नाहीत. हा पाऊस लांबल्याचा परिणाम आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्णांची नोंद होते. यंदा जानेवारी ते जून या काळात सर्वांत कमी केवळ 15 रुग्णांची नोंद झाली आहे. डेेंग्यू हा आजार डासांपासून होतो. डासांची उत्पत्ती ही घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी साठलेल्या पाण्यात होते. फ्रिज, फुलांच्या कुंड्या, गच्चीवरील अडगळीतील सामान, या ठिकाणी पाणी साठून राहते. बहुतेक करून डासांची उत्पत्ती ही घरी साठलेल्या पाण्यातून होत असल्याचे प्रशासनाला आढळून आलेले आहे.
जानेवारी महिन्यात शहरात डेंग्यूच्या 160 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 16 रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीमध्ये 117 जणांची तपासणी केली. त्यात 28 बाधित आढळले. मार्च महिन्यात 128 जणांची तपासणी केली, तीत 22 जण बाधित आढळले. एप्रिलमध्ये या सहा महिन्यांत सर्वाधिक 42 रुग्ण आढळले. मे महिन्यात ही संख्या पुन्हा कमी होऊन 18 झाली आणि जून महिन्यात 131 जणांची तपासणी केली. त्यातील 15 जण बाधित आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सतरा लाखांचा दंड वसूल
डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरुवातीला नोटीस देण्यात येते आणि नंतर दंड आकारला जातो. यानुसार यंदा आरोग्य विभागाने 465 नोटिसा पाठविल्या असून, डासोत्पत्तीप्रकरणी सतरा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

