डाळज येथील अपघातात दोघे गंभीर; पुणे- सोलापूर महामार्गावर दोन मोटारींची धडक

file Photo
file Photo

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा: पुणे- सोलापूर महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच असून, मंगळवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता डाळज क्र. 2 (ता. इंदापूर) येथे दोन मोटारींमध्ये झालेल्या अपघातात मोटारीतील दोघे गंभीर जखमी झाले. रस्ता चुकल्याने महामार्गावर 60 मीटरहून अधिक अंतर चुकीच्या पद्धतीने मोटार मागे घेत असलेल्या मोटारीला दुसर्‍या मोटारीची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. पुण्याहून सोलापूरकडे चाललेली टुरिस्ट स्विप्ट डिझायर मोटार(एमएच 14 एचयू 1707)चा चालक विकास सुरेश पाटील (वय 38, रा. वाकड, पुणे) याने रस्ता चुकल्याने सुमारे 60 मीटरहून अधिक अंतर मोटार मागे आणली.

मात्र यादरम्यान पाठीमागून आलेल्या दुसर्‍या स्विप्ट मोटारीची (एमएच 14 बीके 7315) धडक बसून ती पलटी झाली. यामधून प्रवास करणारे इम—ान पैगंबर तांबोळी (वय 31) व अकिला पैगंबर तांबोळी (वय 50, रा. पुणे) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मृत्युंजय दूत पिंटू मांढरे यांनी महामार्ग पोलिसांना दिली. जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शासकीय रुग्णवाहिका, क्रेनची मदत आवश्यक
महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्रावर क्रेन व रुग्णवाहिका तैनात असणे गरजेचे आहे. मात्र अशा वेळी अनेकदा खासगी क्रेन व रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. उशिराने का होईना पण ही खासगी मदत मिळालेल्यांना नंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रुग्णवाहिका व क्रेनची सुविधा मोफत मिळणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news