

खडकवासला : पानशेत धरण भागातील टेकपोळे येथे अदाणी ग्रुपच्या वतीने विद्युत प्रकल्पासाठी एक टीएमसीचे धरण बांधण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणार या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अदाणी ग्रुपच्या अधिकार्यांनी नुकतीच या प्रकल्पासाठी टेकपोळे परिसरातील जागेची पाहणी केली.
सह्याद्रीच्या डोंगर रांगातील टेकपोळे परिसरातील बहुतेक जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. याबाबत वेल्हे वन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी अदाणी ग्रुपच्या प्रस्तावित विद्युत प्रकल्पाबाबत जागेची पाहणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. टेकपोळेच्या डोंगराखाली कोकणात असलेल्या वारंगी (जि. रायगड) येथे धरण बांधण्यात येणार आहे. वारंगी धरणातील पाणी टेकपोळे धरणात सोडले जाणार आहे. तेथून पाणी पाने (जि. रायगड) येथे उभारण्यात येणार्या वीज निर्मिती प्रकल्पात सोडले जाणार आहे.
रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगररांगात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. कृष्णा खोरे लवादामुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत पाणी आडवता येत नाही. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरून कोकणात, रायगड जिल्ह्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते पंपिग करून डोंगर माथ्यावरील टेकपोळे येथील धरणात साठवले जाणार आहे .पुन्हा तेथून पाणी कोकणात नेऊन त्यावर वीज निर्मिती करण्यात येणार आहे. टेकपोळे येथे वनखात्याच्या जागेत बोगदा खोदण्यात येणार आहे. पानशेत ते टेकपोळेपर्यंत प्रशस्त रस्ते करण्यात येणार आहेत.
पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांच्या खडकवासला धरण साखळीत येणारे पाणी रायगड जिल्ह्याच्या हद्दीपासून येत आहे. खडकवासला साखळीत येणारे पाणी अडविले जाणार नाही. कोकणात वाहून जाणार्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या वतीने या पाण्यावर वीज प्रकल्पासाठी धरणे बांधण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुळशी येथे टाटा कंपनीने धरण बांधून वीज निर्मिती प्रकल्प उभारला. त्या धर्तीवर टेकपोळे व वारंगीचे येथे धरणे बांधून कोकणात वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
नुकतीच अदाणी ग्रुपच्या 'व्हीसी'मध्ये (व्हिडिओ कॉन्फरस) याबाबत माझी चर्चा झाली. वनविभागाकडे अद्याप प्रत्यक्ष याबाबत अदाणी कंपनीचा पत्रव्यवहार झाला नाही. वनविभागाच्या जागेबाबत सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे.
– गोविंद लगुंटे, वन परीक्षेत्र अधिकारी, वेल्हे वन विभाग
नुकतीच अदाणी ग्रुप कंपनीच्या अधिकार्यांनी नुकतीच टेकपोळे व परिसराची पाहणी केली. शेजारील खाणु येथेही एका खासगी कंपनीच्या वतीने वीज प्रकल्पासाठी एक टीएमसीचे धरण बांधण्यात येणार आहे. खाणु येथील जमिनी खासगी मालकीच्या आहेत.
-दिनकर बामगुडे, सरपंच, टेकपोळे.
हेही वाचा