टर्मिनल आह की गावचं स्थानक?

टर्मिनल आह की गावचं स्थानक?

Published on

प्रसाद जगताप, पुणे : रेल्वे प्रशासनाकडून पुणे स्टेशनवरील गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हडपसर येथे रेल्वेचे टर्मिनल उभारण्यात आले आहे. मात्र, येथे पायाभूत सुविधाच व्यवस्थितरीत्या उपलब्ध नसल्यामुळे नक्की हडपसर येथे टर्मिनल आहे की गावातील एखादे छोटेसे स्थानक, हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेचे टर्मिनल म्हटले, की पुणे रेल्वे स्थानक आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, हे लक्षात ठेवून जर हडपसर टर्मिनल पाहिले, तर ते एखाद्या गावातील रेल्वे स्थानकाप्रमाणेच वाटत आहे. येथे दै. 'पुढारी'च्या वतीने शनिवारी (दि. 2) पाहणी करण्यात आली.

या वेळी या रेल्वे स्थानकावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी कोणतेही सार्वजनिक वाहतुकीचे वाहन नव्हते. प्रवाशांना गाडीसाठी आपल्या बॅगा घेऊन तब्बल दोन किलोमीटर चालत यावे लागत आहे. येथील अन्य सुविधादेखील खूपच खालच्या दर्जाच्या आहेत. तिकीट खिडकी फक्त एकच आहे. रेल्वे प्रशासनाला हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा निधी मिळाला आहे. त्याचा वापर करून येथे सुविधा कधी पुरविण्यात येणार, असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

टर्मिनलवर समस्यांचा डोंगर
टर्मिनलवर उभारण्यात आलेला फूट ओव्हर बि—ज मावा खाणार्‍यांनी थुंकून घाण केला आहे. येथे दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच, स्टॅबलिंग लाइनच्या पलीकडेच रेल्वेच्या साहित्याचे ढीग लागले आहेत. यात सिमेंटच्या पटर्‍या आणि लोखंडी ट्रॅक पडले आहेत. टर्मिनलच्या बाहेरील बाजूस कचर्‍याचे ढीग लागले असून, ठिकठिकाणी चार ते पाच फूट गवत वाढले आहे. स्थानकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असून, या रस्त्याचीसुध्दा दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रिक्षाचालक अव्वाच्या सवा भाडे आकारत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

सीसीटीव्ही नाहीत
हडपसर टर्मिनलवर गेल्यावर एखाद्या खेड्यात गेल्याचा भास होतो. या ठिकाणी गेल्यावर एकच आरपीएफचा जवान पाहायला मिळाला. 'कोणीही या आणि जा' याप्रमाणे येथील स्थिती होती. त्यात महत्त्वाचे म्हणजे टर्मिनल परिसरात सीसीटीव्ही नव्हते.

पाण्याची व्यवस्था खूपच खराब
रेल्वे प्रशासनाने येथे केलेली पाण्याची व्यवस्था तर एखाद्या झोपडपट्टीमधील सार्वजनिक नळाप्रमाणेच वाटत आहे. एका लोखंडी टेबलवर काळी प्लास्टिकची टाकी ठेवून प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. ही टाकी आणि येथील परिसर खूपच अस्वच्छ असल्याचे पाहायला मिळाले.

प्रतीक्षालय पत्राशेडमध्ये
हडपसर टर्मिनलवर रेल्वे प्रवाशांसाठी एक प्रतीक्षालय उभे करण्यात आले आहे. हे प्रतीक्षालय एका पत्राशेडमध्येच असून, या ठिकाणी फक्त पाच-सहा बाकडी टाकण्यात आली आहेत. त्यामुळे येथील हे प्रतीक्षालय टर्मिनलवरील वाटत नसून, एखाद्या खेड्यातीलच असल्याचे वाटत आहे. भविष्यात या टर्मिनलवर रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मात्र, येथील स्थिती पाहिल्यावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत.

सध्या हडपसर टर्मिनलवरून 2 गाड्या सुटत आहेत. आगामी काळात येथून आणखी गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रशासनाकडून येथे प्रवाशांच्या सुविधा आणि स्थानकाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने येथील टर्मिनलचा विकास करण्यात येईल आणि प्रवाशांना देखील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

                                – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news