जुन्या सांगवीमध्ये रस्त्याचे काम संथगतीने पावसाळा तोंडावर असताना कामे पूर्ण होणार का?

जुन्या सांगवीमध्ये रस्त्याचे काम संथगतीने पावसाळा तोंडावर असताना कामे पूर्ण होणार का?

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा:  जुन्या सांगवीतील पवारनगर परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात गेल्या पाच महिन्यांपासून अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे रस्तेकाम पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण कसे होणार, असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.

या भागात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी जल वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले; तसेच स्ट्रॉर्म लाईन टाकण्याचे काम संथ गतीने सुरू अहो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना येथून चालणे देखील मुश्किल होत आहे. या खोदकामामुळे पवार नगर परिसरात कचरा गाडी तसेच गॅस सिलिंडर घरपोच सेवा देणार्‍या कंपन्यांच्या छोट्या गाड्यादेखील याठिकाणी येवू शकत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडल्यास खोदलेला रस्ता चिखलमय होणार यात शंका नाही.परिणामी वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागू शकते.

गेल्या पाच महिनंपासून रस्ता खोदून ठेवलेला आहे. स्थानिक कडून जन संवाद सभेत रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदनातून केली होती. पालिका अधिकार्‍यांनी देखील या कामाकडे लष देणे गरजेचे आहे. रस्ता खोदून तसेच खड्डा ठेवला आहे. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना चालणं अवघड होईल, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण नाही झाली तर खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
– चंद्रकांत शेलार, ज्येष्ठ नागरिक

पवारनगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुू आहे. ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. पावसाळा सुरू होणार असल्याने रस्त्यावर मुरूम टाकला असून, सुरुवातीला दीडशे मीटर रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने काम पूर्ण केले जाईल. पावसाळ्यात नागरिकांना रस्ते कामाचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
– सचिन मगर, पालिका कनिष्ठ अभियंता

logo
Pudhari News
pudhari.news