दिगंबर दराडे :
पुणे : राज्य शासन 'स्वराज्य महोत्सव' उपक्रम राबविणार आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, यासाठी स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात नायक, तसेच क्रांतिकारकांबरोबर स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण यानिमिताने केले जाणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभरात 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविला जाईल.
राज्य शासनामार्फत संहितेतील 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत 'स्वराज्य महोत्सव' होईल. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, विविध आस्थापना, दानशूर व्यक्ती नागरिकांनी आपल्या घर, आस्थापनांवर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वराज्य महोत्सवात हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष सभा, तिरंगी फुगे सोडणे, हुतात्म्यांचे दुर्मीळ फोटो, कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावणे, असे नियोजन आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाही होतील. ऐतिहासिक वारसास्थळांच्या ठिकाणी पदयात्रांचे आयोजन केले जाईल. महत्त्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, तालुका, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या, हाताने विणलेल्या किंवा मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत. भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे. जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घ्यावी. सर्वांनाच देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही संस्कृती रुजविण्यासाठी जिल्ह्यात 'हर घर तिरंगा' अभियान राबविले जाणार आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे
जिल्ह्यात विशेष ग्रामसभा
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्त राष्ट्रप्रेम व विविध उपक्रमांबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात महापंचायतराज अभियानही घेतले जाणार आहे. त्यात विवाह नोंदणी, मालमत्तेची नोंदणी, वारस नोंदणी, अतिक्रमण नियमन, सुरक्षा विमा योजना पोषण अभियान, ई-श्रम कार्ड, गॅस कनेक्शन देणे असे उपक्रम लहान मुलांपासून राबविले जाणार आहेत.
– हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी