

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नियतकालिक बदल्या आता नव्याने विकसित केलेल्या अॅपद्वारे ऑनलाइन होणार आहेत. जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेसाठी अवघड क्षेत्रातील शाळांची संख्याही 928 निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमधील शाळा सर्वाधिक अवघड क्षेत्रात समाविष्ट आहेत. बदल्यांपूर्वी अवघड शाळा क्षेत्र आणि सोप्या शाळा क्षेत्र यांची निश्चिती करण्यास सांगण्यात आले होते. त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने पूर्ण केली आहे.
प्रशासकीय बदलीस पात्र शिक्षकांच्या यादींसाठी सेवाज्येष्ठता, एका तालुक्यात असणारी सेवा यांचाही तपशील शिक्षण विभागाने तयार करून कार्यवाही पूर्ण केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक अवघड ठिकाणच्या शाळा या मावळ तालुक्यात 171 ठिकाणी आहेत. त्या पाठोपाठ खेड तालुक्यात 138, मुळशीमध्ये 128, तसेच जुन्नरमध्ये 112, तर आंबेगाव तालुक्यात 110 शाळांचा समावेश आहे. तसेच, अवघड क्षेत्राच्या निकषांनुसार 571 क्षेत्रांची संख्या निश्चित केली आहे. बदलीसाठी शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे सर्वसाधारण क्षेत्रातून अवघड क्षेत्रातील शाळांवर जावे लागणार आहे, असे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.