जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; विभागीय आयुक्तालयाची माहिती

जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; विभागीय आयुक्तालयाची माहिती
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जून महिना संपला, तरी अद्याप पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यातील 99 हजार 279 लोकसंख्या तहानलेलीच असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सध्या नऊ तालुक्यांमधील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वांत जास्त पाणीटंचाईची झळ आंबेगाव तालुक्याला बसत असून, या ठिकाणी 11 गावांमधील 23 हजार 795 बाधितांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी 14 विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात सहा गावांमधील 19 हजार 500 हून अधिक बाधितांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी दहा विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये अनुक्रमे 15 हजार 48 आणि 28 हजार 758 बाधित लोकसंख्या असून, संबंधितांना प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांत 14 आणि नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

बारामती, भोर, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू असून, हवेली तालुक्यात पाच टँकर सुरू आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे 100 टक्के भरूनही यंदा उन्हाळा संपतानाच पाणीटंचाई जाणवू लागली. मोसमी पाऊस वेळेत दाखल होऊनही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील 99 हजार इतक्या लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news