जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक

जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक

बारामती : पुढारी वृत्तसेवा: 'जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला लागलो आहे. तुम्हाला 40 टक्के अनुदानात पॉलिहाऊस व फॅब्रिकेशन व्यवसायाठी प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करून देतो,' असे सांगत त्यापोटी 1 लाख 80 हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण बाळासो जगताप (रा. जळोची, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर जालिंदर काळोखे (रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा) व शीलवंत आडनावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर 2021 ते 7 जुलै 2022 या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादी यांची मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सी आहे. 2016 मध्ये त्यांच्याकडे सुधीर काळोखे हा कामाला होता. तीन-चार महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले. दरम्यानच्या काळात त्यांचा कोणताही संपर्क नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये काळोखे याने फिर्यादीची भेट घेतली. त्याने काही नातेवाइकांना फिर्यादीकडे काम मिळवून दिले. या वेळी त्याने, मी आता जिल्हा उद्योग केंद्रात पुण्यामध्ये नोकरीला लागल्याचे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचा लोगो असणारे कार्डही त्याने फिर्यादीला दिले.

'माझ्या वाईट काळात तुम्ही मला मदत केली. मी आता चांगल्या पदावर नोकरीला लागलो आहे. तुम्हाला पॉलिहाऊस व फॅबि—केशन व्यवसायासाठी योजनेतून प्रत्येकी 25 लाख रुपये मिळवून देतो. त्याला 40 टक्के अनुदान आहे. परंतु, त्यासाठी लागणारा खर्च साहेबांना देण्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल,' असे त्याने सांगितले. फिर्यादीला या दोन्ही प्रकरणांच्या फाईल्स तयार करायला लावल्या. त्यापोटी वेळोवेळी काही रक्कम रोखीत, तर काही रक्कम आरटीजीएसद्वारे स्वीकारली.

त्यानंतर शीलवंत नावाचे अधिकारी स्थळपाहणीसाठी येणार असल्याचे सांगितले. एका व्यक्तीला तो घेऊन आला. त्यांनी 'तुम्ही विश्वासातील आहात. स्थळपाहणीची गरज नाही,' असे म्हणत शीलवंत व स्वतःसाठी प्रत्येकी 20 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर अनेकदा संपर्क करूनही काळोखे यांचा फोन लागला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news