जबरदस्तीने जमीन घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा : 'पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जबरदस्तीने कुणाचीही जमीन घेतली जाणार नाही,' अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 'जमीन संमतीने घेतली जाईल, चांगला मोबदला दिला जाईल आणि त्यानंतरही ज्या लोकांचा विरोध आहे, त्यांना बाजूला राहू द्या. हा प्रकल्प आपल्याला सर्वांच्या संमतीने करायचा आहे. आपण चर्चा करू,'असेही शिंदे यांनी सांगितले. सासवड (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ मैदान क्र. 1 येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मंगळवारी ते बोलत होते.

इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यावर, या भागामध्ये कसा फायदा होतो, हे तुमच्या लक्षात येईल. लोकांच्या हिताचा हा पुरंदरचा विमानतळ दुसरीकडे नेण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होते, आता तो थांबलेला आहे. जे चांगले प्रकल्प आहेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, ते आपण करू, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री विजय शिवतारे, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, आ. गुलाबराव पाटील, आ. उदय सामंत, आ. तानाजी सावंत आदी पदाधिकार्‍यांसह हजारो शेतकरी उपस्थित होते.
पुरंदर-हवेलीच्या अनेक प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ते म्हणाले, गुंजवणी धरण व वितरण व्यवस्था बंद जलवाहिनी योजनेसाठी 50 कोटी रुपये देण्यात येतील. दिवे येथील महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय बाजार संकुलासाठी अडचणी दूर करून त्याच ठिकाणी मंजुरी देण्यात येईल. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील बाधित शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन विमानतळासाठी प्रयत्न करणार. पुणे महापालिकेत समाविष्ट 11 गावांचे करवाढीसंबंधीही तातडीने निर्णय घेऊ. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना मी पत्रे दिली, पण त्यांनी मला काहीही प्रतिसाद दिला नाही. मी त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीशी फारकत घ्या, असे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news