छावा संघटना देणार शिंदे गटाला संरक्षण; एक हजार कार्यकर्ते मुंबईत

छावा संघटना देणार शिंदे गटाला संरक्षण; एक हजार कार्यकर्ते मुंबईत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'शिवसेनेतील शिंदे गटाला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पूर्ण संरक्षण दिले जाणार आहे,' अशी माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला भीमराव मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाब काळे, जिल्हाध्यक्ष सचिन फोलाने, सुनील शिंदे, नीलेश जाधव, देवकर्ण वाघ, अजित जाधव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. जावळे म्हणाले, 'सध्याच्या राजकारणामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी बंड पुकारले आहे. हे सर्व आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत.

छावा संघटनेतील राज्यातील सर्व मावळे शिंदे गटाला समर्थन देत असून, त्यांच्या संरक्षणासाठी एक हजार कार्यकर्ते मुंबईत हजर असतील. एकाही आमदाराच्या केसाला धक्का लागणार नाही.' 'मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा शेतकर्‍यांचे प्रश्न, या सरकारला ते सोडविण्यात अपयश आले आहे. राज्यात केवळ ठाकरेशाही किंवा राऊतशाही चालणार नाही. राऊत यांनीही मराठा समाजाबाबत बोलताना भान राखणे गरजेचे आहे. मराठा क्रांती मार्चा आंदोलनामध्ये ज्या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांना आमदार तानाजी सावंत यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केलेली आहे. ' असे जावळे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news