

चाकण; पुढारी वृत्तसेवा: इमारतीमधील लिफ्ट, मंदिर आणि क्लब हाऊस बांधून न देता तसेच सदनिका नावावर न करता फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने चाकण पोलिसांत केली आहे. 17 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना 30 डिसेंबर 2014 ते 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत चाकण येथील एकतानगर भागात घडल्याचे चाकण पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रमेश जाधव, संतोष जाधव, गुलाबराव जाधव, वासुदेव अरबूज, राधेश्याम यादव, संदीप झगडे, राम झगडे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या इमारतीमधील लिफ्ट, मंदिर आणि क्लब हाऊस बांधून दिले नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून 15 लाख 48 हजार 400 रुपये तसेच अतिरिक्त 2 लाख 32 हजार 260 रुपये, अशी एकूण 17 लाख 80 हजार 660 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. दरम्यान, ज्या बाबी ठरल्या त्या देण्यात आल्या. मात्र, जाणीवपूर्वक खोटी तक्रार दिल्याचे आणि संबंध नसलेली काही नावे मुद्दाम गोवल्याचे संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चाकण पोलिस अधिक तपास करीत आहेत.