चाकण : महावितरणच्या ठेकेदारानेच दिला बोगस वीजजोड

चाकण : महावितरणच्या ठेकेदारानेच दिला बोगस वीजजोड

चाकण, पुढारी वृत्तसेवा: महावितरण कंपनीला न कळवता परस्पर वीजवाहिन्यांना केबल जोडून दोन ठिकाणी वीजजोड घेण्यात आल्याचा प्रकार चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील तुलसी पार्क ( रासे फाटा, ता. खेड ) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी महावितरणने चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून, महावितरणच्याच एका ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोघांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे. सुनील किसन कड ( रा. रासे, ता. खेड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

या बाबत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गंगाराम तळपे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे. महावितरणकडून चाकण शिक्रापूर रस्त्यावरील वीज मीटरची तपासणी सुरू असताना वीजवाहिन्यांना परस्पर केबल जोडून खासगी वीज मीटर लावून महावितरणची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वीजवापर सुरू असल्याचा प्रकार समोर आला. चोरून वीजवापर करणार्‍या यातील दोन जणांवर वीज चोरीची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे चाकण विभागाचे अधिकारी मदन मुळूक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news