

चाकण : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मंत्रालय मुंबईमधील ज्या चौकात आहे, त्या चौकाचे नाव हुतात्मा राजगुरू चौक असे आहे. आता तेथे हुतात्मा राजगुरू यांचा पुतळा बसविण्यात येणार असून त्याच्या चौथर्याचे काम पूर्ण झाले आहे. गेली कित्येक वर्षे मुंबईच्या या चौकात फक्त हुतात्मा राजगुरू चौक अशी नामफलक असलेली पत्र्याची पाटी लागलेली असायची.
येथे फक्त नावाची पाटी नको तर या चौकात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा पुतळा असावा, असे उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः खेड तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या डबेवाल्यांना वाटत असे. कारण बहुतांश डबेवाले हे राजगुरूनगरचे आहेत.
यातूनच मग "मुंबई डबेवाला असोसिएशन" च्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
ही मागणी शासनाने मान्य केली व हुतात्मा राजगुरू चौकात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा पुतळा बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सध्या चौथऱ्याचे काम सुरू आहे. लवकरच तेथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा पुतळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उभा राहणार असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.