

चाकण; पुढारी वृत्तसेवा: किरकोळ कारणावरून सात-आठ जणांच्या टोळक्याने राडा घालत कोयत्याने वार करून दोघांना जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.21) सायंकाळी साडेसहा वाजता चाकण औद्योगिक वसाहतीत वासुली फाटा (ता. खेड) येथे घडली. महाळुंगे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील संदेश संजय पडवळ (वय 19, रा. आवळेवस्ती) याला पोलिसांनी अटक केली असून, इतर सात ते आठ जण फरार झाले आहेत. याप्रकरणी अक्षय अनिल ठुले (वय 25, रा. भांबोली) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वासुली फाटा येथील करण कॉम्प्लेक्समध्ये किराणा दुकान आहे.
तेथे ते कामासाठी गेले होते. या वेळी कॉम्प्लेक्सजवळ आलेल्या दोघांना कॉम्प्लेक्सच्या मालकाचा मुलगा करण याने हटकले. त्या तिघांमध्ये शिवीगाळ करीत भांडणे झाले. या घटनेच्या 15 ते 20 मिनिटांनी तेथे 8 ते 9 जण हातात कोयते व लाकडी दांडके घेऊन आले. या वेळी करण हा घरात पळून जाऊन लपला. गोंधळ पाहून फिर्यादी तेथे गेले. त्या वेळी टोळक्यातील दोघांनी त्यांच्या डोक्यात वार केले व लोखंडी रॉडने मारहाण केली. या वेळी करणची बहीणही बाहेर आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली व तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कोणी तरी चोरले. या मारहाणीत त्या जागीच बेशुद्ध पडल्या. महाळुंगे पोलिस तपास करीत आहेत.