

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल,' अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. 17 जूनला दहावीचा निकाल लागला आहे. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्याने अकरावी वगळता इतर काही ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे लवकरात लवकर गुणपत्रिका मिळाव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
गुणपत्रिकांची छपाई करून त्या वितरीत करण्याच्या प्रक्रियेला आणखी एक आठवडा लागणार आहे. विद्यार्थ्यांना अकरावी वगळता इतर शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेद्वारे तात्पुरता प्रवेश मिळू शकेल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुणपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व गुणपत्रिका तयार होऊन त्या वितरित करण्यासाठी पुढील आठवडा उजाडणार आहे. सोमवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्या जातील. लवकर तयार झाल्या तर शुक्रवारी देखील वाटप होतील. यासंदर्भात अधिकृत परिपत्रक येत्या एक ते दोन दिवसांत काढण्यात येणार आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ