

पुणेः पुढारी वृत्तसेवा: गांजाची विक्री करणार्या एका महिलेला खुळेवाडी परिसरातून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी (एक) पथकाने बेड्या ठोकल्या. सुवर्णा अशोक पवार (वय 24, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी, चंदननगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या ताब्यातून 3 लाख 31 हजार 200 रुपयांचा 16 किलो 560 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
सुवर्णा हिने गांजा विक्री करण्यासाठी तिच्या आईकडे दिला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे आपल्या पथकासह गस्तीवर होते.
त्यावेळी पोलिस कर्मचारी मनोज साळुंके यांना मिळालेल्या माहितीनुार सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, कर्मचारी विशाल शिंदे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, रेहाना शेख यांच्या पथकाने छापा टाकून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी करून घराची झडती घेतली असता, गांजा मिळून आला. दरम्यान संबंधित महिलेच्या पतीवरदेखील गांजातस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, तो सध्या कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.