पुणे; पुढारी वृत्तसेवा: बनावट संमतिपत्र तयार करून खोट्या सह्यांद्वारे ज्येष्ठ व्यक्तीच्या एफ. डी. खात्यातून वेळोवेळी 68 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात सुखसागर नगर येथील 80 वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या मुलीसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे एका नागरी सहकारी पतसंस्थेत एफडी खाते आहे.
त्यातील रक्कम आरोपींनी स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतली. त्यासाठी त्यांनी फिर्यादींच्या नावाचे बनावट संमतिपत्र तयार केले. त्यानंतर त्याच्या आधारे विथड्रॉल फार्मवर फिर्यादींच्या खोट्या सह्या करून वेळोवेळी 68 लाख 40 हजार 792 रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्यादींनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.