खेड शिवापूर : माझ्या देशावर माझे प्रेम आहे..! आदिवासीबांधवांनी शेतातच फडकाविला तिरंगा

शिवापूर (ता. हवेली) परिसरात भात लावणी करताना आदिवासी बांधवांनी तिरंगा फडकविला.
शिवापूर (ता. हवेली) परिसरात भात लावणी करताना आदिवासी बांधवांनी तिरंगा फडकविला.

किरण दिघे

खेड शिवापूर : शिवगंगा खोर्‍यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्यांना अद्याप स्वतःची पक्की घरे नाहीत. रोजच्या उदनिर्वाहाचा प्रश्नही नेहमीच त्यांच्यासमोर असतो. मात्र, इतरांच्या शेतात काम करून पोट भरणार्‍या कातकरी समाजाने शनिवारी भात लावणी करताना शेतातच तिरंगा ध्वज फडकावून आपले देशावरचे प्रेम व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला शिवगंगा खोर्‍यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, ज्या आदिवासी बांधवांना स्वतःची पक्की घरेच नाहीत, त्यांनी आपले देश प्रेम कसे व्यक्त करायचे, हा प्रश्न आज कातकरी समाजाला पडला.

खेड शिवापूर भागात मिळेल तिथे रोजगारी करून, तसेच नदी-ओढ्यांवर खेकडे, मासे पकडून त्यांची विविध गावांमधून फिरून कातकरी समाजाच्या नागरिकांकडून विक्री केली जाते. शनिवारी प्रत्येक घरांवर तिरंगा फडकला गेला. मात्र, त्या वेळी हा समाज इतरांच्या शेतामध्ये भात लावण्याच्या कामात व्यस्त होता. 'आपण जरी शेतात काम करीत असलो, तरीही आमचेही भारत देशावर प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला तिरंगा ध्वज आणून द्या,' अशी मागणी या अदिवासी मजुरांनी शेताच्या मालकाकडे केली. त्यांनीही या मजुरांना तिरंगा आणूण दिला आणि शेतात तो डौलाने फडकू लागला.

माझं सुदीक माझ्या देशावर प्रेम…
शेतामध्ये भात लावणी करताना तिरंगा हातात घेऊन कातकरी समाजातील बांधवांनी देशावरील आपले प्रेम सिद्ध केले आहे. शेतामध्ये काम करताना देशावरील आपले प्रेम दाखवून दिले, हे गौरवास्पद आहे. शेतातील कातकरी समाजाच्या युवकाला याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'माझं सुदीक माझ्या देशावर प्रेम हाय, म्हणून मी शेतातच झेंडा फडकवला हाय!' या उपक्रमाबाबत आदिवासी बांधवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असून, प्रत्येक घरावर तिरंगा फडकत आहे. मात्र, आमचे स्वत:चे पक्के घर नसल्याने आम्ही तिरंगा कुठे फडकावयाचा, हा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला. त्यानंतर शेतातच तिरंगा फडकाविण्याचा निर्णय घेत देशावरील प्रेम व्यक्त केले.
                                                                      लहू पवार, आदिवासी मजूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news