

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्यात 2018 मध्ये हायब्रीड अॅन्यूटी अंतर्गत 13 रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यातील पहिला रस्ता हा पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा ते सिंहगड या दरम्यानचा रस्ता नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू केला होता. दोन वर्षांत पूर्ण होणारा रस्ता हा चार वर्षे पूर्ण होत आले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गचाळ कारभारामुळे अपूर्णच आहे, हे शिवगंगा खोर्यातील नागरिकांचे दुर्दैव आहे, असे म्हणावे लागेल. नोव्हेंबर 2018 रोजी या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. आमदार भीमराव तापकीर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती यावेळी होती.
त्यानंतर अनेक वेळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, तर कधी संथ गतीने काम सुरू आहे अशा बातम्या दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर काम जलदगतीने सुरू केले; मात्र या प्रकल्पाचा पहिलाच रस्ता हा चार वर्षे पूर्ण होत आले तरी अपूर्णच असल्याने अनेक अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाले आहेत. त्यामुळे पर्यटक व स्थानिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत असून, आता आमचा अंत संपला आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन करणारच, असा सरपंच सतीश दिघे, उपसरपंच राजू सट्टे, माजी उपसरपंच आण्णा दिघे व तंटामुक्ती अध्यक्ष पै. उमेश दिघे यांनी असा इशारा दिला आहे.
दरम्यान, सुमारे सहा ते सात महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत शिवापूरने याबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी मध्यस्थी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या समवेत ग्रामस्थांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्वरित खड्डे बुजवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते अजूनही तसेच आहेत.
डांबरीकरण-काँक्रिटीकरण वादात रस्ता रखडला
रस्त्याचे काम सुरू असताना श्रीरामनगर ते शिवापूर हा जवळपास एक ते दीड किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरणचा करण्याचे आश्वासन भूमिपूजन वेळी दिले होते; मात्र ठेकेदार यांच्याकडून निविदेत हा डांबरीकरण आहे असे सांगण्यात येत होते. त्यामुळे काही स्थानिक नेत्यांनी डांबरीकरण होऊ दिले नाही. याऐवजी काँक्रिटीकरण करावे, असे स्थानिकांचे म्हणणे होते. या वादामुळे हा रस्ता अपूर्णच राहिला आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
रस्त्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. त्यास अजूनही मंजुरी मिळाली नाही. तसेच गावातील काही नेत्यांच्या विरोधामुळे हे काम राहिले होते. हे खड्डे बुजविण्यास ठेकेदार उदासीन आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते पुढील दोन दिवसांत बुजविण्यात येतील.
– अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग