‘खाकी’चा रंग वेगळा ! सरकारी कापड बंद करून सरसकट भत्ता

‘खाकी’चा रंग वेगळा ! सरकारी कापड बंद करून सरसकट भत्ता
Published on
Updated on

संतोष शिंदे :  पिंपरी : पोलिसांचे गणवेश एकसारखे दिसावेत, यासाठी महासंचालक कार्यालयाकडून कापड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, अलीकडे एक ते दोन वर्षांपासून कापड बंद करून अधिकार्‍यांसोबत कर्मचार्‍यांनाही गणवेश भत्ता दिला जात आहे. त्यानुसार, पोलिस स्वतःच्या पसंतीनुसार खाकी कापड खरेदी करू लागल्याने गणवेशाच्या रंगात फरक दिसून येत आहे. पोलिस ठाण्यातील हजेरी किंवा मोठ्या कार्यक्रमात पोलिस एकत्रित येतात, त्यावेळी खाकी तुझा रंग कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरू केल्या भारतातील काही भाग सोडून बहुतांश राज्यात पोलिसांसाठी खाकी रंगाचा गणवेष वापरला जातो. कोरड्या उष्ण हवामान असलेल्या भागात भरपूर धूळ असल्याने अन्य रंगाचा गणवेश घाम आणि धुळीमध्ये लवकर खराब होतो. त्यामुळे पोलिसांसाठी खाकी रंगाचा वापर केला जाऊ लागल्याचे सांगितले जाते. तसेच, मातीचा रंग म्हणून देखील खाकीची ओळख आहे. त्यामुळे पोलिसांच्या खकीला आगळेवेगळे महत्व आहे. मात्र, अलीकडे गडद, मळकट, फिकट खाकी, अशी वेगवेगळ्या रंगाची खाकी बाजारात आली आहे.

सरकारी कापड जाड असल्याने यापूर्वीही अनेकजण बाजारातील महागड्या कापडाला पसंती देत होते. त्यातच आता शासनानेच कापड देणे बंद केल्याने पोलिस बांधवांना खाकी कापडातील वेगवेगळी 'व्हरायटी' अनुभवायला मिळत आहे. मात्र,यामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतल्या जाणार्‍या परेड किंवा दररोज पोलिस ठाण्यांमध्ये होणार्‍या हजेरी दरम्यान पोलिसांच्या गणवेशात फरक दिसून येऊ लागला आहे.

 शासन नियमांनुसार पोलिसांनी गणवेश परिधान करणे अवश्यक आहे. त्यासाठी ठरवून दिलेल्या मानकांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी बाजारात उपलब्ध असणार्‍या वेगळ्या दिसणार्‍या कापडाचा गणवेश परिधान करीत असेल, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
सतीश माने,
सहायक पोलिस आयुक्त,

वीस लाखांचे कापड वाटप

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यन्वित झाल्यानंतर सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक शाखा, मुख्यालय यांना तब्बल वीस लाख रुपये किमतीचे कापड वाटप करण्यात आले होते. मात्र, बहुतांश जणांनी या कापडाचा वापर केला नाही.

केवळ 570 रुपयांत मिळत होते कापड
यापूर्वी शासनाकडून 'रेमंड' कंपनीचे कापड उपलब्ध करून दिले जात होते. गणवेशासाठी लागणारे हे खाकी कापड 'सरकारी कपडा' म्हणून ओळखला जात होता. त्यासाठी कमर्चार्‍यांच्या पगारातून 570 रुपयांची कपात केली जात होती. मात्र, आता कर्मचार्‍यांना पाच हजार 100 रुपयांचा गणवेश भत्ता सुरु करण्यात आला आहे. यामध्ये शिलाईसह गणवेशासाठी लागणार्‍या इतर वस्तू देखील खरेदी कराव्या लागणार आहेत.

खाकीचा खादी पॅटर्न
शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या पोलिस खात्यात गणवेशाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पोलिस अधिकार्‍यांचा संपूर्ण पोशाख आणि वर्किंग पोशाख हा वेगळा असतो. मात्र, अलीकडे खाकीच्या अनेक रंगछटा सोबत तिचे पॅटर्नही उपलब्ध झाले आहेत. यातील सर्वाधिक विशेष बाब म्हणजे पोलिस खादी प्रकारातील कापडाचेदेखील गणवेश शिवून घेत आहेत.

गणवेश नियमनाचे काय ?
शासनाकडून भत्ता मिळू लागल्याने रंगाकडे दुर्लक्ष करून पोलिस महागड्या कापडाचे गणवेश वापरताना दिसत आहेत. काही पोलिस अधिकार्‍यांचे बूट देखील वेगळेच असतात. नियमानुसार अधिकार्‍यांचा बूट हा प्लेन ब्राऊन लेदरचा असावा. तसेच, तो प्लेन 'टो' कॅपसह खाकी पायमोज्यासह असावा. मात्र, याकडेदेखील दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पोलिस खात्यातील गणवेश नियमनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

अधिकार्‍यांसाठी पाठवला प्रस्ताव
पोलिस अधिकार्‍यांना चार वर्षांतून एकदा सुमारे पाच हजार इतका गणवेश भत्ता दिला जातो. मात्र, अलीकडे कर्मचार्‍यांना दरवर्षी पाच हजार 100 रुपये इतका गणवेश भत्ता सुरू केल्याने अधिकर्‍यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकार्‍यांना देखील गणवेश भत्ता वाढवून देण्याबाबत महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कार्यालय अधीक्षक राजेश राठोड यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news