खडकवासला : वरसगाव धरण वाहू लागले; धरणसाखळीत 98.37 टक्के पाणीसाठा

खडकवासला : वरसगाव धरण वाहू लागले; धरणसाखळीत 98.37 टक्के पाणीसाठा

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला साखळीतील सर्वाधिक पाणीसाठा क्षमतेचे वरसगाव धरण (वीर बाजी पासलकर जलाशय) शनिवारी (दि. 13) सकाळी सात वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले. त्यामुळे खडकवासला धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मुठा नदीच्या विसर्गात वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. सायंकाळी पाच वाजता वरसगावमधून 5 हजार 785 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे, तर खडकवासलामधून मुठा नदीच्या पात्रात 18 हजार 491 क्युसेक पाणी सोडले जात होते.

दुपारपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी अधूनमधून सरी कोसळत आहेत. मात्र, सकाळपेक्षा धरणात पाण्याची आवक थोडी कमी झाली आहे. वरसगाव शंभर टक्के भरल्याने सकाळपासून टप्प्या- टप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली. शुक्रवारच्या तुलनेत पानशेतचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या पानशेतमधुन 5 हजार 408 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

टेमघरही भरण्याच्या मार्गावर
टेमघर धरणात 87.19 टक्के साठा झाला असून, येत्या दोन-तीन दिवसांत टेमघरही शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, 'पानशेत- वरसगाव धरणाच्या क्षेत्रात पाऊस सक्रिय आहे. त्यामुळे पाण्याची आवक कायम आहे. पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.' आज सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 25, वरसगाव येथे 30, पानशेत येथे 25 व खडकवासला येथे 4 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला शंभर टक्के, पानशेत 100 टक्के व टेमघर 87.19 टक्के भरले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news