खडकवासला : राजगड, तोरणागड पर्यटकांनी फुलले

रिमझिम पाऊस व दाट धुक्यात हरवलेल्या राजगडावर रविवारी शेकडो पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला.
रिमझिम पाऊस व दाट धुक्यात हरवलेल्या राजगडावर रविवारी शेकडो पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला.

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: जोरदार वाहणारे थंडगार वारे, रिमझिम पाऊस आणि दाट धुक्यात हरविलेले राजगड, तोरणागड रविवारी सुटीच्या दिवशी आलेल्या पर्यटकांनी फुलून गेले होते. रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील केळद (ता. वेल्हे) येथील मढे घाटातील धबधब्याचा परिसर तसेच गुंजवणी, पानशेत धरण भागातही पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.राजगडावर खाद्य पदार्थांचे कागद, प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या अशा कचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे.

गडावर तसेच बुरूज, तटबंदी खाली कचर्‍याचे ढीग पडले असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. रिमझिम पाऊस व दाट धुक्यात हरवलेल्या राजगडावर दिवसभरात एक हजारावर पर्यटकांनी हजेरी लावली. हातात भगवा ध्वज घेऊन 'हर हर महादेव, जय शिवराय'च्या जयघोषात तरुणाईने वर्षाविहाराचा आनंद लुटला. गडाच्या पद्मावती, संजीवनी, सुवेळा माचीपासून गडाच्या पाऊलवाटा, प्रवेशद्वारे पर्यटकांनी फुलून गेली होती.

राजसदरेच्या आवारातच खाद्य पदार्थ विक्रेते बसत असल्याने पर्यटकांना तेथे उभे राहता येत नाही. खडक कड्यातील धोकादायक मार्ग, तटबंदी, बुरुजावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी पुरातत्व खात्याचे कर्मचारी धावपळ करत होते. तोरणागडावरही पर्यटकांनी गर्दी केली होती. जोरदार वारे व अधूनमधून सरी कोसळत होत्या. पावसाची तमा न बाळगता तरुणाई 'जय शिवराय'च्या जयघोषात गडावर चढाई करत होते. रविवारच्या सुटीमुळे मढे घाट, केळद भागात पर्यटकांची गर्दी होण्याचे गृहीत धरून वेल्हे पोलिसांनी मुख्य रस्त्यावर तपासणी नाके उभारले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news