खडकवासला धरणाजवळ पुलाला भगदाड

खडकवासला धरणाजवळ पुलाला भगदाड

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  हजारो पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणतीरावर लष्कराच्या डीआयएटीजवळील पुलाचा भराव खचून भगदाड पडले आहे. पुलाची संरक्षक भिंतही जमीनदोस्त झाली आहे, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेसह सिंहगड, पानशेत, वेल्हे भागाचा संपर्क तुटण्याची टांगती तलवार उभी आहे. खडकवासला धरण तुडुंब भरले आहे. धरणातील पाण्याच्या लाटा थेट रस्त्याच्या पुलाला धडकत आहेत. तसेच रस्त्याच्या गटाराचे पाणी वेगाने वाहत आहे. त्यामुळे काल सोमवारी (दि. 24) सकाळी पुलाचे भराव कोसळू लागले. मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजेपर्यंत रस्त्याचा एका बाजूचा भाग खचून भगदाड पडले. जोरदार पावसात हा रस्ता तुटून वाहतूक बंद पडण्याची शक्यता आहे.

रस्ता खचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. एका बाजूला बॅरिकेड लावण्यात आले आहेत. मात्र, समोरासमोरून वाहने ये-जा करताना बस, ट्रक अशा मोठ्या वाहनांच्या चालकांना कसरत करावी लागत आहे. पुलावरून वाहने धरणात कोसळण्याचा धोकाही वाढला आहे. सिंहगड, पानशेत भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने या धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी फलक लावून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता इंगळे व खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते यांनी केली आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी या गंभीर प्रकाराकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

बुधवारी (दि. 26) भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. धरण भरल्याने पाण्याचा फुगवटा पुलापर्यंत पसरत आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रशस्त पूल उभारण्यात येणार आहे. दुर्घटना टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.
आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या पुलाचे कठडे तुटले होते. तेव्हापासून पुलावर अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
सौरभ मते, माजी सरपंच

कोट्यवधी रुपये खर्च करून दोन्ही बाजूला रस्ता प्रशस्त करून चकाचक केला आहे. मात्र, अरुंद व धोकादायक पुलाचे काम तसेच ठेवले. पूल अत्यंत अरुंद असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.
अनिता इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news