

खडकवासला : दोन दिवसांच्या रिमझिमनंतर सोमवारी (18) सकाळपासून रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगावच्या डोंगरी पट्ट्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरण येत्या चार पाच दिवसांत शंभर टक्के भरून वाहणार आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला साखळीत 18.58 टीएमसी म्हणजे 63.73 टक्के पाणीसाठा झाला होता, तर पानशेत धरणात 66.14 टक्के साठा झाला होता.
वरसगाव, पानशेत धरण क्षेत्रातील तव,दासवे,दापसरे,टेकपोळे भागात संततधार पावसासह अधूनमधून सरी कोसळत आहेत. खडकवासला क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत केवळ 1,712 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, 'पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत धरण पाच दिवसांत शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.'