

रांजणगाव गणपती, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील पंचतारांकित म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव एमआयडीसीमध्ये एका कंत्राटावरून चौघांनी खंडणी मागितली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) येथे फिर्यादी दिलीप कांतिलाल थेऊरकर यांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट बंद करावे अन्यथा त्यांनी आम्हाला 25 हजार रुपये दरमहा खंडणी द्यावी, अशी मागणी संशयित दत्तात्रय गायकवाड (रा. मलठण, ता. शिरूर) याने मागितली होती.
याप्रकरणी फिर्यादी दिलीप यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने संशयित दत्तात्रय व अन्य तीन साथीदारांनी थेऊरकर यांच्या चारचाकी वाहनाला रांजणगावमधील क्लासिक कंपनीच्या गेटजवळ त्यांची चारचाकी गाडी आडवी लावून गाडीच्या खाली ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी या चौघांनी दिलीप यांना आपल्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून घेऊन जात कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट सोडून देण्याची धमकी देत मारहाण केली.
तसेच थेऊरकर यांच्या चारचाकी वाहनाची काचही फोडली आणि 50 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. या मारहाणीत दिलीप गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, फिर्यादी दिलीप याने तात्काळ झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली व रांजणगाव पोलिसांनी दत्तात्रय गायकवाड व अन्य तीन साथीदारांवर गाडी अडविणे, खंडणीची मागणी व खंडणी वसुली, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.