पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयमहाले वस्ती येथे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. कोयमहाले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात व शेजारच्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर आहे. तेथे बिबट्या दबा धरून बसला आहे. गेले तीन दिवसांपासून संध्याकाळी शाळेच्या आवारात बिबट्या ठाण मांडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात बिबट्याचे ठसे आढळले.
प्राथमिक शाळा आवारात बिबट्याचा वावर व शेजारच्या उसाच्या शेतात बिबट्याचे वास्तव्य असल्याने शाळेतील लहान मुलांसाठी ही बाब धोकादायक ठरली आहे. त्यामुळे पालक घाबरले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश दरेकर, सोपान गावशेते, मच्छिंद्र नरवडे यांनी केली होती. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला आहे.