

पौड; पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील मंगळवारी बेपत्ता झालेल्या सातवर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवारी (दि. 3) सकाळी आढळला. पोलिसांनी काही तासांतच आरोपीला जेरबंद केले. मात्र, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पौड (ता. मुळशी) येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने छाया सानप यांना निवेदन दिले.
व्यापारी संघ पौड, पौड ग्रामपंचायत आणि पौड ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात पौड हायस्कूलच्या विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, वेगवान निकाल लागला पाहिजे, अशी मागणी आंदोलनकत्र्यांनी केली. पौडच्या प्रभारी सरपंच मोनाली ढोरे, माजी सभापती उज्ज्वला पिंगळे, युवासेना संघटक संकेत दळवी, व्यापारी संघाचे संस्थापक विशाल राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, अजय कडू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.