

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : कृष्णानगर येथील पाणी सोडणार्या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती सुरू आहे. लोकांनी त्याबाबत तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने काहीच केले नसल्याने रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पुणेकरांवर एक दिवसआड पाणी कपातीचे संकट आले आहे.
अशा वेळी सर्व खापर पावसावर फोडण्यापेक्षा मागील वर्षभरात पाणी वाया गेल्याच्या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कृष्णानगर येथे रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. तेथून ये-जा करणारे महापालिकेचे अधिकारी मात्र या पाणी गळतीकडे दुर्लक्ष करतात. सततच्या पाणीगळतीमुळे तीन महिन्यांपूर्वी बनविलेला डांबरी रस्ता उखडून गेला आहे.
पाऊस पडत नसतानाही संपूर्ण उन्हाळ्यामध्ये कृष्णानगर तरवडेवस्ती रस्ता पावसाळ्यासारखा ओला चिंब दिसत होता.
एक नंबर गल्लीपासून सहा नंबर गल्लीपर्यंत पाणी वाहत असून, त्यानंतर तिथून आंबेकर यांच्या जमिनीमध्ये पाणी जात आहे. शहर परिसरात अशीच पाणी गळती असेल तर, सध्या पुणेकरांवर आलेले पाणी संकट याला जबाबदार कोण, असा ही सवाल सध्या उपस्थित होऊ लागला आहे.