

भोर; पुढारी वृत्तसेवा: भोरपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंडगाव- हुंबेवस्ती पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. भोर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सर्वत्र जोरदार पावसाने थैमान घातले आहे. वेळवंड खोर्याचे शेवटचे टोक असलेल्या कोंडगाव परिसरात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
हुंबेवस्तीवर रहदारीसाठी असलेला पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे, त्यामुळे वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. कोंडगाव- सांगवी परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम असून काही ठिकाणी दरड, शेतीचे बांध, ताली, कोसळल्या आहेत. अतिवृष्टीमुळे मागील काही दिवसांपासून विजेचा प्रवाह खंडित झाला असल्याचे पोलिस पाटील हुंबे यांनी सांगितले.